Wednesday, November 11, 2009

चेंबुर मधील प्रसंग

चेंबुरचा गजबलेला भाग, मंगळवार दुपारची वेळ, रस्त्यावर रहदारी खूप, मोनोरेल चे काम चाललेले त्यामुळे मधोमध खणून ठेवले होते. त्यामधेच रहदारी अडली, मोठा जॅम झाला. पण वाहने का अडली आहेत ते कळत नव्हते. रिक्षात बसलेल्या एका बाईला समोरचा थोड्या दूरवरचा रस्ता रिकामा दिसत होता. मधेच काहीतरी असेल – काय आहे बघुन तरी यावे असे म्हणत (नेहमीच्या सवयी प्रमाणे नाक खुपसायला) ती पुढे गेली. तिला दिसले ते चित्र भयंकर होते. गर्दीत एका रिक्षावाल्याचा धक्का एका इनोव्हावाल्याला लागला होता. महागड्या गाडीला धक्का लागल्यामुळे गाडीवाल्याचे पित्त खवळले होते. त्याच्या हातात एक मोठा बांबू होता, बांबू जोराजोराने हवेत फिरवत तो रागारागाने बिचा-या गरीब रिक्षेवाल्यावर डाफरत होता, भरपाई मागत होता, मारून टाकण्याची धमकी देत होता, आणि रिक्षेवाला गयावया करुन हातापाया पडून माफी मागत होता, पब्लिक बघत होते...

रिक्षातून उतरलेल्या बाईने सर्व प्रकार पाहिला, काय चालले आहे ते तिला कळले. तिच्या अंगात काही तरी संचारले तिने जाऊन त्या इनोव्हावाल्याच्या हातातील बांबू पकडला आणि आवाज चढवून त्याला जाब विचारला, स्वतःची ओळख त्याला सांगितली, गाडीत बसून निघून जाण्याचा आदेश त्याला दिला. तो गार झाला. गाडीत बसला. शक्य तितक्या वेगाने गाडी वळवून पसार झाला. रिक्षेवाल्याचा जीव भांड्यात पडला, रहदारी पूर्ववत सुरु झाली.


आणि लोक म्हणतात नवरे आपल्या बायकांचे कौतुक कधी करतच नाहीत...

No comments: